BSNLच्या गोदामाला आग; लक्षावधी रूपयांची हानी: केबल जळाल्या

WhatsApp Group

खामगाव – स्थानिक पारखेड शिवारामधील भारत संचार निगम लिमिटेडच्या गोदामाला आग लागली. शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान लागलेल्या या आगीने क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केले होते. त्यामुळे या आगीत लक्षावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

भारत संचार निगम लिमिटेडचे एमआयडीसीतील पारखेड शिवारामध्ये गोदाम आहे. या गोदामाचा वापर केबलसह इतर साहित्य ठेवण्यासाठी वापर करण्यासाठी येतो. दरम्यान, शनिवारी सकाळी शार्ट सर्कीटमुळे या गोदामाला आग लागली. मोठ्याप्रमाणात केबल आणि इतर साहित्य जळाल्यामुळे एमआयडीसी परिसरात प्रचंड धुराचे लोट उठले.

आगीची माहिती मिळताच नगर पालिकेचा अग्निशमन विभागासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अग्निशमन विभागाने पाण्याचे दोन बंब रिचविले होते. तरीही ही आग आटोक्यात आली नव्हती.

शॉर्ट सर्कीट की घातपात..
मध्यंतरी भारत संचार निगम लिमिटेच्या गोदामातून मोठ्या प्रमाणात केबल गायब झाले होते. गायब झालेले केबल गेले तरी कुठे? हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच आता गोदामाला आग लागली. त्यामुळे गोदामात शॉर्ट सर्कीट झाले की घातपात करण्यात आला असा प्रश्न आता आगीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोदामातून गायब झालेल्या केबलचा साठा मॅनेज करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना? अशी चर्चाही होतं आहे.