दहशतवादाशी लढणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता – सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस

WhatsApp Group

मुंबई: दहशतवादी कृत्ये  हे वाईटच आहेत. दहशतवादाशी लढा देणे ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन  संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई.अँटोनियो गुटेरेस यांनी केले. त्यांनी आज हॉटेल ताज येथे भेट देऊन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना  श्रद्धांजली वाहिली. या निमित्ताने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव,  राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुटेरेस म्हणाले, दहशतवादाविरोधात लढा देणे ही जागतिक जबाबदारी आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीस पदाचा कार्यभार स्वीकारताच दहशतवादाशी लढा देण्यासाठी उपाय सुचविणारे कक्ष तयार केले. यात अनेक राष्ट्रांच्या समन्वयाने कार्य चालते आहे. दहशतवादाशी लढा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले जाते. इथे दहशतवादाच्या मूळ कारणावर अभ्यास करण्यात येतो.

26/11 च्या देशावर झालेले हल्ल्यात शहीद झालेले लोक हे खरे हिरो आहेत. हा अत्यंत रानटी हल्ला होता. बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांसह  यात 166 लोकांनी प्राण गमावले आहेत. या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करुन  भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या सहकार्याविषयी श्री. गुटेरेस यांनी कृतज्ञता व्यक्त केली.