FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात, 29 दिवसांत 64 सामने होणार; जाणून घ्या सर्व माहिती

WhatsApp Group

FIFA World Cup: आजपासून जगभरात फुटबॉलची जादू उफाळून येईल. आज रात्री कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने फिफा विश्वचषकाला सुरुवात होत आहे. पुढील 29 दिवस 64 सामने खेळवले जातील. 18 डिसेंबरला फुटबॉल जगताला नवा चॅम्पियन मिळणार आहे. संघ, गट, स्वरूप आणि वेळापत्रकांपासून थेट प्रसारणापर्यंत, क्रीडा जगतातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेशी संबंधित सर्व माहिती येथे जाणून घ्या.

कोणता संघ कोणत्या गटात?

अ गट: कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ब गट: इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
क गट: अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ड गट: फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्युनिशिया
ई गट: स्पेन, कोस्टारिका, जर्मनी, जपान
एफ गट: बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
जी गट: ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
एच गट: पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया प्रजासत्ताक

गट टप्प्यात प्रत्येक संघ त्याच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ 16 च्या फेरीत पोहोचतील. येथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर होतील. राऊंड ऑफ 16 मध्ये आठ सामने होतील. आठ विजेते संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून चार विजयी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत ग्रुप स्टेजमध्ये एकूण 48 सामने होणार आहेत. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. ३ डिसेंबरपासून बाद फेरीचे सामने सुरू होतील. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि 6.30 वाजता सुरू होतील.

कुठे होणार सामने?

हे सर्व सामने कतारमधील आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. अल बेट स्टेडियम, लुसाइल स्टेडियम, खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम, एज्युकेशन सिटी स्टेडियम, अल थुमामा स्टेडियम, स्टेडियम 974, अल रेयान स्टेडियम आणि अल जानूब स्टेडियम येथे सामने होणार आहेत.

लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघायचे?

Viacom-18 कडे भारतात FIFA विश्वचषक 2022 च्या प्रसारणाचे अधिकार आहेत. अशा परिस्थितीत स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. त्याच वेळी, Jio Cinema अॅपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.