कानपूरमध्ये भीषण अपघात, भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी, 26 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत 28 जण जखमी झाले आहेत. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरात्रानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवी मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत होते त्यावेळी हा अपघात घडला. दुसरीकडे, राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या ट्रॅक्टरमध्ये 50 हून अधिक लोक स्वार होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीएम योगी यांनी ट्विट केले की, ‘कानपूर जिल्ह्यातील रस्ता अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पीएम रिलीफ फंडातूनही मदत दिली जाईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमओने जारी केलेल्या ट्विटमध्ये या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पीएमओने ट्विट केले की, ‘कानपूरमधील ट्रॅक्टर-ट्रॉली दुर्घटनेने दु:ख झाले आहे. पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये, जखमींना 50 हजार रुपये दिले जातील.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर आणखी जीव वाचू शकले असते.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा