हरियाणा : राज्यातील हिस्सार जिल्ह्यात एक वेदनादायक घटना घडली आहे. हिसार जिल्ह्यातील आदमपूर-अग्रोहा रस्त्यावर कार एका झाडावर आणि विजेच्या खांबाला धडकली. जोराची धडक बसल्याने कार पलटी झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. आदमपूर येथे एका लग्न समारंभात सहभागी होऊन कारमधील प्रवासी परतत असताना दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिसारमधील खारा बरवाला गावातील सागर (23) आणि शोभित (22) आणि किशनगड गावातील अरविंद (24), अभिनव (22), अशोक (25) आणि दीपक (23) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेला भुनेश (25) हा राजस्थानमधील सुरतगड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्याच वेळी, ओडिशाच्या नयागड जिल्ह्यात मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. ओडगाव मॉडेल पोलिस स्टेशन हद्दीतील कोमांडा पाथरा येथे गुरुवारी रात्री हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, माधव प्रधान (20), सूर्यकांत प्रधान (19) आणि राकेश नायक (19, रा. महेश्वरपूर) अशी मृतांची नावे आहेत. जवळच्या गावात रामनवमीच्या जत्रेतून ते घरी परतत असताना ही घटना घडली.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी त्यांना गंभीर अवस्थेत ओडगाव सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे डॉक्टरांनी सूर्यकांतला मृत घोषित केले, तर अन्य दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.