Video: गुजरातच्या मोरबीमध्ये भीषण अपघात; झुलता पूल अचानक नदीत पडला, 90 हून अधिक जणांचा मृत्यू

WhatsApp Group

Gujarat s Morbi Cable bridge collapse: गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी एक मोठा अपघात घडला आहे. मच्छू नदीतील पूल कोसळल्याने नदीत पडून 90 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण जखमीही झाले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पाच दिवसांपूर्वी नूतनीकरणानंतर केबल पूल पुन्हा सुरू करण्यात आला. पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. पूल कोसळल्यानंतर नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने प्रयत्न करत होते.

पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडले. बचावकार्य सुरूच आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर अधिकाऱ्यांशी अपघाताबाबत चर्चा केली. पंतप्रधानांनी परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास आणि बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, सीएम पटेल यांनी ट्विट करून सांगितले की, यंत्रणेकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत आपण जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. सीएम पटेल म्हणाले की, पीएम मोदींसोबतचा पुढील कार्यक्रम आटोपून मी गांधीनगरला पोहोचत आहे. गृह राज्यमंत्र्यांना घटनास्थळी पोहोचून बचाव कार्यात मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले आहे. राज्य आपत्ती निवारण दलासह (SDRF) तुकड्या बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.