भीषण अपघात; बोलेरो कारची ट्रकला धडक, 11 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात काल रात्री एक भीषण रस्ता अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात 5 महिला आणि दोन लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पुरूर पोलिस स्टेशन हद्दीतील जगत्रा गावाजवळ बोलेरो वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

बालोदचे एसपी जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले की, धमतरी जिल्ह्यातील सोराम-भटगाव येथील काही लोक बुधवारी रात्री उशिरा बोलेरो गाडीने लग्न समारंभासाठी मरकटोला गावात जात होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते जगत्रा गावाजवळ पोहोचले तेव्हा त्यांचे वाहन एका ट्रकला धडकले. या अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक बालक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मुलाला रुग्णालयात पाठवले. वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार ट्रकचालकाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी काल झारखंडच्या जामतारा आणि गुमला जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात किमान आठ जण ठार आणि 30 जण जखमी झाले. जामतारा जिल्ह्यात बुधवारी दुपारी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, असे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) जामतारा यांनी सांगितले. यापूर्वी गुमला जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले होते की, एका विवाह सोहळ्याला जाणारी चारचाकी गाडी उलटल्याने चार जण ठार आणि 30 जण जखमी झाले होते.