फरिदाबाद: हरियाणामधील फरिदाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आईशी झालेल्या वादानंतर घराबाहेर पडलेल्या एका महिलेला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवून दोन नराधमांनी तिचे अपहरण केले आणि धावत्या कारमध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार (गँगरेप) केला. एवढ्यावरच न थांबता, तासनतास तिला कारमध्ये ओलिस ठेवून अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेला चालत्या वाहनातून रस्त्यावर फेकून दिले. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
वादानंतर घराबाहेर पडली अन् संकटात सापडली
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पीडित महिलेचे तिच्या आईशी घरगुती कारणावरून भांडण झाले होते. रागाच्या भरात ती आपल्या मित्राच्या घरी जाण्यासाठी घराबाहेर पडली. रात्री १२ च्या सुमारास ती दोन नंबर चौक येथून कल्याणपुरीला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. यावेळी तिथे आलेल्या एका मारुती इको (व्हॅन) चालकाने तिला लिफ्ट देण्याचे नाटक केले. व्हॅनमध्ये चालकासह दोन तरुण बसलेले होते. प्रवासाचे साधन मिळत नसल्याने पीडितेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, जो तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरला.
आरोपींनी पीडितेला इच्छित स्थळी नेण्याऐवजी गाडी गुरुग्राम रोडच्या दिशेने वळवली. हनुमान मंदिराजवळ निर्जन स्थळी गाडी नेऊन आरोपींनी पीडितेला कारमध्येच बंधक बनवले. सुमारे अडीच ते तीन तास आरोपी तिला रस्त्यावर फिरवत राहिले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र नराधमांनी तिला बेदम मारहाण केली. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास अत्याचार केल्यानंतर आरोपींनी एसजीएम नगर येथील मुल्ला हॉटेलजवळ धावत्या गाडीतून पीडितेला खाली फेकून दिले आणि पळ काढला.
रक्ताच्या थारोळ्यात सापडली पीडिता
रस्त्यावर फेकल्यामुळे पीडितेच्या तोंडाला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या आहेत. पहाटे साडेतीनच्या सुमारास जखमी अवस्थेत तिने आपल्या बहिणीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. बहीण घटनास्थळी पोहोचली तेव्हा पीडिता रक्ताच्या थारोळ्यात आणि फाटलेल्या कपड्यांत बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. तिला तातडीने नागरी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दिल्लीला रेफर करण्यात आले आहे. तिच्या चेहऱ्यावर १० ते १२ टाके पडले आहेत.
पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी
कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएसपींच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची इको व्हॅन शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेने फरिदाबादमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
