प्रसिद्ध मराठी पत्रकार अजित चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

WhatsApp Group

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या पंक्षांमध्ये जोरदार इनकमिंग चालू झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम केलेल्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कायमच चढाओढ असते. नुकताच भाजपमध्ये एक पक्षप्रवेश झाला असून हा पक्षप्रवेश पूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

झी २४ तास या प्रसिद्ध वृत्तवाहीनीत न्यूज अँकर म्हणून काम केलेले प्रसिद्ध पत्रकार अजित चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे ( Ajit Chavan joins BJP ) . या पक्षप्रवेशादरम्यान अजित चव्हाण यांची भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी अजित चव्हाण हे झी २४ तास सोडून जय महाराष्ट्र या वृत्तवाहीनीत Executive Editor म्हणून रुजू झाले होते.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितित अजित चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशादरम्यान भाजप कार्यकर्यांनी ‘अजित भाऊ तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है’ च्या जोरदार घोषणा दिल्या होत्या.

प्रसिद्ध मराठी न्यूज अँकर अशी ओळख निर्माण केलेले अजित चव्हाण हे राजकारणाच्या पटावर कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्वाचे असेल. चव्हाण यांनी आजवर अनेक राजकारण्यांना आपल्या दमदार प्रश्‍नांनी घाम फोडला आहे, मात्र चव्हाण आता स्वतः राजकारणात आले असल्याने ते कसं राजकारण करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेली अनेक वर्षे आपल्या अनोख्या शैलीत बातम्या सांगणाऱ्या अजित चव्हाणांच नाव महाराष्ट्राला काही नवीन नाही. गेली कितीतरी वर्षे सामान्य मराठी जनता त्यांना टीव्हीवर पाहत आली आहे.

या प्रसिद्ध चेहऱ्याच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला नक्की कीती फायदा होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच. मात्र थेट एका प्रसिद्ध पत्रकारालाच पक्षात घेऊन भाजपने मोठा खेळी केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित चव्हाण हे पत्रकारितेतील आपलं काम थांबवणार आहेत. ज्या प्रमाणे पत्रकारितेत त्यांनी नाव कमावलं तसंच ते राजकारणातही आपलं नाव मोठं करतील असा विश्वास भाजपकडून व्यक्त  करण्यात आला आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता येणाऱ्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पंक्षामध्ये अनेक छोटे-मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. नुकताच शिवसेनेने खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसच्या वाणिज्य व व्यापार विभागाचे उपाध्यक्ष शैलेंद्रसिंग ठाकूर आणि अचलसिंग ठाकूर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.