राज्यात स्टार्टअपचे जाळे विस्तारण्यासाठी व्यापक धोरण – प्रधान सचिव मनीषा वर्मा

WhatsApp Group

मुंबई – राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदींसारख्या महानगरांमध्ये असलेले स्टार्टअप्स राज्याच्या इतर भागातही विस्तारले जावेत यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत धोरणे आखण्यात येत आहेत, अशी माहिती या विभागाच्या मनीषा वर्मा यांनी दिली.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग जाहीर करण्यात आली. यामध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने ‘टॉप परफॉर्मर’ क्रमांक पटकावला. २०२१ च्या आवृत्तीच्या या क्रमवारीची घोषणा आणि विजेत्या राज्यांचा सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्ली येथे संपन्न झाला. विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

राज्याला स्टार्टअप हब बनविण्याचे ध्येय – प्रधान सचिव मनिषा वर्मा

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना श्रीमती वर्मा म्हणाल्या की, राज्य शासनाने स्टार्टअप आणि उद्योजकता विकासासाठी राबविलेली विविध धोरणे, निर्णय, राज्यातील पूरक वातावरण, अनुकुल इकोसिस्टीम याची ही फलश्रुती आहे. केंद्र शासनामार्फत मिळालेल्या पुरस्कारामुळे यापुढील काळातही अधिक प्रभावी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. उद्योजकता आणि नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनुकुल धोरणे राबविण्यात येत आहेत. राज्य शासन, उद्योजक, स्टार्टअप्स, एंजेल गुंतवणुकदार, इनक्युबेटर्स या सर्वांच्या सहभागातून स्टार्टअप्सच्या विकासाला चालना मिळाली आहे. स्टार्टअप यात्रा, स्टार्टअप सप्ताह, इनक्युबेटर्सची निर्मिती, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमार्फत युवकांमध्ये उद्योजकतेला चालना, विद्यापीठांमध्ये इनक्युबेटर्स, स्टार्टअप्सना पेटंटसाठी अनुदान अशा अनेक निर्णयांमुळे राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. राज्याला प्रमुख स्टार्टअप हब बनविण्याचे आमचे ध्येय आहे. सर्वांच्या सहभागातून याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. कुशवाह म्हणाले की, राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. नाविण्यपूर्ण दृष्टीकोन व प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि राज्यात नाविन्यपूर्ण उद्योगांसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी नाविन्यता सोसायटी यापुढील काळातही विविध उपक्रम राबवेल, असे त्यांनी सांगितले.