बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे विलंब शुल्काने भरावयाच्या तारखांना मुदतवाढ

0
WhatsApp Group

मुंबई: इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही आवेदनपत्रे विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांना इयत्ता बारावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने विलंब शुल्काने भरण्यास रविवार दिनांक 18 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उच्च माध्यमिक शाळांनी/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची तारीख सोमवार दिनांक 19 जून 2023 पर्यंत असून विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख मंगळवार दिनांक 20 जून 2023 अशी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी परीक्षा जुलै – ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक‍ शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच भरावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.