भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरी ‘आऊट’ तर निवडणूक समितीत फडणवीस ‘इन’

WhatsApp Group

भाजपने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची पुनर्रचना केली आहे. संसदीय मंडळात मोठा बदल करत नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना हटवण्यात आले आहे. याशिवाय 15 सदस्यीय केंद्रीय निवडणूक समितीतही या नेत्यांना स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपने केंद्रीय निवडणूक समितीमध्ये समावेश केला आहे. या निर्णयाकडे महाराष्ट्र आणि केंद्रातील मोठा राजकीय बदल म्हणून पाहिले जात आहे.

याआधीही गोवा, बिहारसारख्या राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्वाने बढती दिली आहे. मात्र आता केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान देऊन फडणवीस यांची व्याप्ती आता महाराष्ट्राबाहेर असल्याचे स्पष्ट झाले असून भाजपमध्येही त्यांचा राष्ट्रीय दर्जा आहे. एवढेच नाही तर फडणवीस यांची आज महाराष्ट्र विधानपरिषदेचे नेते म्हणूनही घोषणा करण्यात आली आहे. पण नितीन गडकरींच्या बाबतीत असे नाही आणि ते आता फक्त केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री आहेत. ते आता भाजपमध्ये कोणतेही पद भूषवत नाहीत किंवा ते कोणत्याही राज्याचे प्रभारीही नाहीयत. नितीन गडकरींचा राजकीय दबदबा पूर्वीसारखा राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नितीन गडकरी हे अनेक दिवसांपासून भाजपपासून दूर राहताना दिसले आहेत. पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका असोत किंवा यंदाच्या यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुका, प्रचारात किंवा अन्य कोणत्याही भूमिकेत ते कुठेच दिसले नाहीत.

या 15 नेत्यांना निवडणूक समितीत स्थान

भाजपकडून नवीन निवडणूक समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण 15 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून पक्षाध्यक्ष असल्याने जेपी नड्डा हे समितीचे प्रमुख आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, बीएस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इक्बाल सिंग लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जातिया, भूपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथूर, बीएल संतोष आणि वनथी श्रीनिवास यांचा समावेश करण्यात आला आहे.