
आयपीएल 2025 हंगामात पाच वेळा विजेतेपद मिळवलेला चेन्नई सुपर किंग्स संघ सर्वात मोठा धक्का बसलेला संघ ठरला आहे. या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 9 सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे गुणतालिकेत ते तळात पोहोचले असून प्लेऑफच्या स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर फेकले गेले आहेत. उरलेले सामने केवळ औपचारिकता म्हणून खेळावे लागणार आहेत.
कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे त्याला हंगामातून बाहेर व्हावं लागलं, आणि त्याच्या अनुपस्थितीत आयुष म्हात्रेला संघात स्थान देण्यात आलं. म्हात्रेने आपल्या जबरदस्त फलंदाजीने – विशेषतः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळलेल्या 94 धावांच्या खेळीने – क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आता आणखी एक महत्त्वाची एन्ट्री चेन्नई सुपर किंग्स संघात झाली आहे. संघाचा युवा विकेटकीपर फलंदाज वंश बेदी दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. डाव्या गुडघ्याच्या लिगामेंटला इजा झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली असून, हंगामात तो एकही सामना खेळू शकला नाही.
त्याच्या जागी CSK ने गुजरातच्या संघात खेळणाऱ्या युवा विकेटकीपर फलंदाज उर्विल पटेलला संघात सामावून घेतलं आहे. उर्विलने सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा 2024-25 मध्ये दमदार कामगिरी करत आपलं कौशल्य सिद्ध केलं होतं. आता त्याला आयपीएलसारख्या मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा सध्याचा हंगाम अपेक्षेप्रमाणे गेला नसला तरी, संघ व्यवस्थापन पुढील मोसमाच्या तयारीसाठी युवा खेळाडूंना संधी देत नव्या पिढीची पायाभरणी करत आहे.