Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला, दोन्ही पायांना लागली गोळी

WhatsApp Group

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान Imran Khan यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या दोन्ही पायात गोळी लागली असून त्यांना बुलेट प्रूफ वाहनातून उपचारासाठी लाहोरला नेण्यात आले आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला आहे. इम्रान खानसोबत उपस्थित असलेले खासदार फैसल जावेद खान गंभीर जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या स्थानिक मीडियानुसार इम्रान खान यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. हल्ल्यानंतर इम्रान खान यांचे पहिले वक्तव्यही आले आहे. ते म्हणाले की, अल्लाहने मला नवीन जीवन दिले आहे. मी पुन्हा लढेन.दुसरीकडे इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून गृहमंत्र्यांकडून तातडीने अहवाल मागवला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान खान वजीराबाद शहराजवळ रॅली काढत होते, त्यावेळी त्यांच्या कंटेनरजवळ गोळीबार झाला. गोळी लागल्याने इम्रान खान यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या हल्ल्यात अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती देताना इम्रान खान यांच्या सरकारमधील मंत्री आणि माजी पंतप्रधानांच्या जवळचे मानले जाणारे फवाद चौधरी म्हणाले की, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला. त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. चौधरी म्हणाले की, हल्लेखोराने एके-47 मधून गोळीबार केला.

पाकिस्तानी मीडियानुसार, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला उपस्थित लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. नावेद असे त्याचे नाव सांगितले जात आहे. इमरान खान यांच्या या हल्ल्यामागे विरोधी पक्षांचा हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 28 ऑक्टोबरपासून इम्रान खान पाकिस्तानच्या विद्यमान सरकारविरोधात आझादी मार्च काढत आहेत. सर्व शहरांमध्ये मोर्चे काढून ते जनतेला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले आहे.