मुंबई: राज्य क्षयरोगमुक्त करण्याचा आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे. राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी केले.
आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबी मुक्त पंचायत”अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राज्याच्या क्षयरोग निर्मूलन विभागाचे सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, सहसंचालक (रुग्णालय) डॉ. विजय कंदेवाड, सहाय्यक संचालक डॉ. अशोक रणदिवे, जे एस डब्ल्यू फाउंडेशनचे आशिष जैन, यु एस ई ए संस्थेचे प्रबोध भाम्बल, शंकर दापकेकर, इंडिया हेल्थ फंडचे माधव जोशी व गुरुविंदर, पी पी कन्सल्टंट डॉ. सायली शिलवंत, कार्यक्रम अधिकारी डॉ. अंकिता अहिरे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील दहा गावांमध्ये “टीबीमुक्त पंचायत”अभियानाची सुरूवात करण्यात येत असल्याचे सांगत आयुक्त म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ सालापर्यंत “टीबी मुक्त भारत”करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या या महत्त्वकांक्षी योजनेतंर्गत देशभरातील १००० पंचायतींना टीबी मुक्त करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील “टीबी मुक्त पंचायत”अभियानाची सुरवात रायगड जिल्ह्यातून करण्यात येत आहे. जे एस डब्ल्यू फाउंडेशनच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यातील दहा गावामधील सुमारे १० हजार नागरिकांची तपासणी करून टीबी रुग्णाचा शोध, निदान, उपचार व निर्मुलन करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अभियानाच्या यशानंतर राज्यभर “टीबी मुक्त पंचायत”अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला “द युनियन साऊथ इस्ट आशिया (USEA) यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार असून, जे एस डब्ल्यू फाउंडेशन सी एस आर मधून आर्थिक मदत देणार आहे. या बैठकीत माय लॅबचे हँडी एक्स-रे मशीन तसेच, खोकल्याच्या आवाजावरून टीबी निदान करणाऱ्या ॲपचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
याप्रसंगी ठाणे, रायगड, पालघर व रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.