दीपक केसरकर येण्याच्या आधीपासूनच सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेचा आहे – वैभव नाईक

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – शिवसेनेचा शेवटचा आमदार गेला तरी मी शिवसेनेसोबतच राहणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार हे भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पायाखाली गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच्यासमोर झुकले नाहीत, ते तुमच्यासमोर काय झुकणार? सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना एक फोन लावला तरीदेखील हे सरकार वाचेल. मात्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे कोणासमोर झुकणार नाही, असंही वैभव नाईक म्हणाले.

वैभव नाईक पुढे म्हणाले, जे दीपक केसरकर संजय राऊत यांचा राजीनामा मागत आहेत, त्या केसरकरांनी आधी राजीनामा द्यावा. दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना मतदान केलं नव्हतं. तरी देखील शिवसेना सोडून गेलेले आमदार आहेत त्यांनी राजीनामा द्यावा मग संजय राऊत यांचा राजीनामा देऊन आम्ही त्यांना निवडून सुद्धा आणू असंही आमदार वैभव नाईक यावेळी बोलताना म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी बंड केलं तरीदेखील सावंतवाडी मतदारसंघातील जनता शिवसेनेसोबत आहे हे दाखवण्यासाठी सावंतवाडीमध्ये रॅली काढण्यात आली आहे. भाजपने पैशांच्या जीवावर आमदार फोडले असून भाजप मदमस्त झाली आहे. दीपक केसरकर त्यांचे प्रवक्ते सांगतात उद्धवजी आणि भाजप यांना एकत्रित करण्यासाठी हे करतो. मात्र उद्धवजी एका फोनवर एकत्र येऊ शकतात. पण महाराष्ट्राचा सह्याद्री कोणासमोर कधीच झुकणार नाही ही उद्धवजी यांची भूमिका आहे. दीपक केसरकर येण्याच्या आधीपासूनच सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेचा आहे. उदय सामंत यांना आम्ही बाजूला राहून प्रतिष्ठा देण्याचे काम केले. मात्र या मंडळींनी मंत्रिपदाच्या गाजरासाठी बंडखोरी केली आहे. बंडखोरी करुन गेलेल्या आमदारांवर गद्दारीचा डाग पुसणार नाही, तसेच त्यांची निष्ठा राहणार नाही, असंही वैभव नाईक यावेळी बोलताना म्हणाले.