पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष यशराज देसाई, समितीचे उपाध्यक्ष विजय पवार आदी उपस्थित होते.
या अश्वारुढ पुतळ्याची उंची ९ फूट असून हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाडे येथे उभारण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.