क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी बातमी; विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

WhatsApp Group

Eoin Morgan Retirement : इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) याने आज (मंगळवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मॉर्गनने इंग्लंडकडून 225 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 शतकांसह 6957 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॉर्गनच्या एकूण 14 शतकांसह 7701 धावा आहेत.

इयॉन मॉर्गनने 126 सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले, ज्यात त्याने 76 सामने जिंकवून दिले आहेत. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक म्हणजे इंग्लंडला घरच्या भूमीवर 2019 आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेतेपद इंग्लंडने पटकावले होते.

मॉर्गनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. त्याने 115 सामन्यात 14 अर्धशतके आणि 136.18 च्या सरासरीने 2458 धावा केल्या. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी टी-20 कर्णधार आहे, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 72 पैकी 42 सामने जिंकले आहेत. मॉर्गन गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. मॉर्गनने गेल्या 28 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ दोन अर्धशतके झळकावली होती. मॉर्गनच्या जागी आता जोस बटलरकडे इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाची कमान सोपवली जाऊ शकते, असे मानले जात आहे.

निवृत्तीची घोषणा करताना, मॉर्गनने एका निवेदनात म्हटले की, नीट विचारविनिमय केल्यानंतर, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ प्रभावाने माझी निवृत्ती जाहीर करण्यासाठी येथे आलो आहे. हा निर्णय घेणे साहजिकच माझ्यासाठी सोपं नव्हते, परंतु हिच ती योग्य वेळ असल्याचे मला वाटते. मला दोन वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली, याबाबत स्वतःला नशिबवान समजतो. इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे भविष्य उज्ज्वल आहे.