‘नफरत छोडो – संविधान बचाओ’ अभियानाचा उत्साहपूर्ण प्रारंभ! गांधीमार्गाने मनामनांतील भिंती सांधण्याचा निर्धार!

WhatsApp Group

देशभरातील तीनशेहून अधिक जनआंदोलनांच्या पुढाकाराने आजपासून सुरू होत असलेल्या ‘नफरत छोडो – संविधान बचाओ’ अभियानाचा आरंभ पुण्यातही विविध संघटना-जनआंदोलने व जागरुक नागरिकांच्या सहभागाने आज म. गांधी पुतळ्याच्या साक्षीने करण्यात आला. देशात जाणीवपूर्वक पसरवले जाणारे विद्वेषाचे आणि अविश्वासाचे वातावरण बदलून परस्पर सौहार्द, सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावावर आधारित ‘आयडिया ऑफ इंडिया’ पुन्हा एकदा समाजमानसात रुजवणे; महागाई, बेरोजगारी, शेतकरी-कष्टकऱ्यांची लूट असे गंभीर प्रश्न ऐरणीवर आणणे आणि सत्ताधाऱ्यांकडून होणारी लोकशाही प्रक्रिया आणि संरचनांची पायमल्ली आणि नागरिकांच्या हक्कांची गळचेपी याविरोधात निर्भयपणे उभे राहणे हा या अभियानाचा उद्देश आहे – अशी माहिती जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या राष्ट्रीय समन्वयक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र. यांनी दिली.

गांधीजींच्या अहिंसेच्या आणि निर्भयतेच्या मार्गाने आपल्याला ही वाटचाल करायची आहे असा निर्धार नागरिक हक्क सुरक्षा समिती व स्वराज अभियानाचे नेते मानव कांबळे यांनी व्यक्त केला. संविधानातील तत्वांच्या प्रचाराचा वसा घेतलेले प्रा. सुभाष वारे, कष्टकऱ्यांचे नेते नीतीन पवार, कष्टकरी संघर्ष महासंघाचे नेते काशीनाथ नखाते, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक मारुती भापकर, स्त्रीपुरुष समतेच्या चळवळीतील कार्यकर्त्या अड्. अर्चना मोरे, सर्वोदयी कार्यकर्त्या यामिनी चौधरी, शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्या गौरी भागवत अशा अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी देशात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची गरज अधोरेखित करत अभियानाला पाठिंबा व्यक्त केला.

मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे तरुण कार्यकर्ते व अलका पावनगडकर यांच्या आशयपूर्ण गीतांतून निर्धार व्यक्त झाला. राजेंद्र बहाळकर यांनी सूत्रसंचालन केले. इब्राहीम खान, अस्लम बागवान, सुहास कोल्हेकर, प्रसाद बागवे, रमाकांत धनोकर, संजय मा.क., प्रियांका सोनावणे, श्वेता ढेंबरे व अन्य अनेक कार्यकर्त्यांच्या सहभागातून ‘नफरत छोडो – भारत जोडो’ व ‘संविधान बचाओ – देश बनाओ’ हा संदेश देत आज या अभियानाचे उद्घाटन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी गांधीपुतळ्याच्या समक्ष संविधानाच्या प्रास्ताविकेचे सहवाचन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मिरवणुकीने जाऊन तेथे या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या मुद्द्यांवर लोकसंवाद करण्यासाठी 2 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर दरम्यान देशातील सुमारे 500 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 75 किलोमीटर्सच्या पदयात्रा काढण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातही अशा तीन पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे, असे या प्रसंगी आयोजकांनी जाहीर केले. या पदयात्रांचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा