T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा 10 गडी राखून पराभव करून इंग्लंडने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले असून रविवारी त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. या पराभवामुळे भारताचे फायनल खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. टीम इंडिया 2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कपची शेवटची फायनल खेळली होती, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता 13 नोव्हेंबरला अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात त्यांनी केएल राहुलची विकेट गमावली. कर्णधार रोहित शर्माने 27 धावा केल्या मात्र त्यासाठी त्याने 28 चेंडूंचा सामनाही केला. सूर्यकुमार यादवही केवळ 14 धावा करून बाद झाला आणि 12व्या षटकापर्यंत भारताने 75 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. विराट कोहली हँडल घेऊन खेळला पण त्याने 40 चेंडूत 50 धावांची संथ खेळी खेळली. दुसऱ्या टोकाकडून हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 63 धावांची धडाकेबाज खेळी करत भारताला 168 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने 3 बळी घेतले.
To the MCG in style 🤩
England make it to their second Men’s #T20WorldCup final in three editions 🙌 #INDvENG pic.twitter.com/llz20I6nRe
— ICC (@ICC) November 10, 2022
भारताने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्याच षटकापासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते आणि त्यांनी भारतीय गोलंदाजांवर सातत्याने हल्ले केले. पॉवरप्लेमध्येच इंग्लिश संघाने 63 धावा केल्या होत्या आणि त्यांचे आक्रमण सुरूच होते. सुरुवातीला हेल्सने दमदार फटकेबाजी केली. मात्र नंतर, हळूहळू बटलरही रंगात आला आणि त्यानेही आक्रमक फटकेबाजी सुरू केली. बटलरने 49 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी खेळली, तर हेल्सनेही 47 चेंडूत 86 धावांची नाबाद खेळी खेळली. 168 धावसंख्येचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांना अप्रतिम कामगिरी दाखवता आली नाही. पॉवरप्लेमध्ये भुवनेश्वर कुमार आणि इतर गोलंदाज विकेट घेऊ शकले नाहीत. अक्षर पटेल आणि आर अश्विन या दोघांनाही भारताला यश मिळवून देता आले नाही.