Viral Video: “हाच खरा भारतीय जुगाड!” सरसो का साग बनवण्यासाठी तरुणाने शोधला ‘ड्रिल मशीन’चा जुगाड

WhatsApp Group

हिवाळा सुरू झाला की खवय्यांना वेध लागतात ते ‘मक्के दी रोटी आणि सरसो दा साग’चे. पंजाबचा हा प्रसिद्ध पदार्थ चवीला जितका उत्कृष्ट असतो, तितकाच तो बनवणे कष्टाचे काम असते. विशेषतः मोहरीची पाने शिजल्यानंतर ती नीट घोटण्यासाठी (Blend) खूप वेळ आणि शारीरिक कष्टाची गरज असते. मात्र, एका भारतीय तरुणाने या कष्टावर असा काही जालीम तोडगा काढला आहे की, ते पाहून भल्याभल्या इंजिनिअर्सचे डोळे पांढरे होतील. त्याने साग घोटण्यासाठी चक्क ‘ड्रिल मशीन’चा वापर केला असून याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

जेव्हा आईने ‘साग घोट’ असे सांगितले आणि मुलाने ड्रिल मशीन उचलली

हा मजेशीर प्रकार इन्स्टाग्रामवर @kajalvaishnav नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, मुलाची आई त्याला शिजलेला साग नीट एकजीव (मॅश) करण्यास सांगते. सामान्यतः यासाठी लाकडी रवी किंवा चमचा वापरला जातो. मात्र, या पठ्ठ्याने थेट घरातील ड्रिल मशीन आणली आणि रवीचा दांडा त्या मशीनला जोडला. हे पाहून आई पूर्णपणे अवाक झाली आणि तिने मुलाला हे काय करतोयस? असा सवाल केला. त्यावर मुलाने दिलेले उत्तर अधिकच मजेशीर होते.

V

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajal Kaur Layal (@kajalvaishnav)

तासांचे काम मिनिटांत पूर्ण; आईही झाली थक्क

मुलाने आईला शांतपणे सांगितले की, तो फक्त तिच्या आदेशाचे पालन करत आहे. आईने जेव्हा त्याला स्पष्ट केले की, तिने रवी वापरण्यास सांगितले होते ड्रिल मशीन नाही, तेव्हा मुलाने आत्मविश्वासाने मशीन चालू केली. काही सेकंदातच कुकरमधील तो साग एखाद्या हाय-टेक ब्लेंडरमध्ये केल्यासारखा मऊ झाला. “तासांचे काम आता मिनिटांत होणार,” असे त्याने आईला पटवून दिले. आईला जरी सुरुवातीला हा प्रकार विचित्र वाटला असला तरी, कामाचा वेग पाहून ती देखील गप्प बसली.

नेटकऱ्यांकडून ‘देसी जुगाड’चे कौतुक

भारतीय लोकांच्या ‘जुगाड’ करण्याच्या वृत्तीची चर्चा जगभरात असते, आणि हा व्हिडिओ त्याचेच एक उत्तम उदाहरण ठरला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले की, “हे कल्पक शोध फक्त भारतातच लावले जाऊ शकतात,” तर दुसऱ्याने मजेशीरपणे लिहिले की, “नासाच्या शास्त्रज्ञांनी हा व्हिडिओ पाहू नये, नाहीतर ते या मुलाला पळवून नेतील.” यापूर्वी २०२४ मध्येही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक जोडपे अशाच प्रकारे ड्रिल मशीनचा वापर करून स्वयंपाकघरातील काम सोपे करत होते.