Assembly Election 2024 : महाराष्ट्र-झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा आज, दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Assembly Election 2024 : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. आयोगाकडून तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे, याचा अर्थ त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. 81 जागांच्या झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे.
जवळपास 50 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखाही निवडणूक आयोग जाहीर करू शकतो. यामध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी विजयी झाले होते. त्यांनी अमेठीतून निवडणूकही लढवली, जिथे ते विजयी झाले. दोन्ही जागा जिंकल्यानंतर त्यांनी वायनाडची जागा सोडली. काँग्रेसने वायनाड मतदारसंघासाठी प्रियंका गांधी यांना पक्षाच्या उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावर राजकारणातील अनेक गोष्टी अवलंबून असतील. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना असला तरी अनेक फॅक्टर महत्त्वाचे आणि गेमचेंजिंग ठरणार आहेत. महायुतीत भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्ष आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीराजे यांची तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचाही परिणाम जाणवणार आहे.