
मुंबई – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या चर्चेत आले आहेत. शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार चर्चेत आलंय. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी त्यांचं सातारा जिल्ह्यातील डेरे हे त्यांचं मुळ गाव आहे. कोयना नदीच्या काठावरी हे गाव सध्या चर्चेत आलंय. आपल्या गावचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी आशा येथील ग्रामस्थांना आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या बातमीनुसार डेरे गावात फक्त 30 घरं आहेत. महाबळेश्वपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अभयारण्य आणि कोयना नदी यांच्यामध्ये हे गाव वसलंय. या गावातील बहुतेक नागरिक हे प्रवासी मजूर असल्यामुळे अनेक घरं ही बंदच आहेत. गावात नियमित रोजगाराच्या संधी नसल्यामुळे अनेकांना मुंबई किंवा पुण्यात जावून काम करावं लागतं.
एकनाथ शिंदे यांचे वडील बऱ्याच वर्षांपूर्वी ठाण्यात स्थायिक झाले. शिंदे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये डेरे गावावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरूवात केली आहे. शिंदेंच्या या गावात शाळा, हॉस्पिटल या आवश्यक सोयी नाहीत. गावकऱ्यांना शिक्षणासाठी रस्त्याने 50 किलोमीटर किंवा नावेनं 10 किलोमीटर प्रवास करावा लागतो. असं असलं तरी एकनाथ शिंदे यांनी या गावात दोन हेलिपॅड बनवले आहेत. कारण, शिंदे हे नेहमी हेलिकॉप्टरनेच आपल्या गावी येतात. यामधील एक हेलिपॅड शिंदे यांनी यापूर्वीच बनवले असून ते कोयना नदीच्या किनारी आहे, तर दुसरे त्यांच्या गावातील घरापासून काही मीटर दूर असलेल्या डोंगरावर बनवण्यात आलं आहे. या हेलिपॅडचाही लवकरच वापर सुरू होण्याची आता शक्यता आहे.