एकनाथ शिंदें यांचा मोठा दावा; ”३५ नव्हे ४० शिवसेना आमदार माझ्यासोबत, आणखी १० आमदार येतील”

WhatsApp Group

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. “माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत”, असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे यांची काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. पण एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुजरातच्या सूरतहून हे सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटीला रवाना झाले आहेत. आमदारांसोबत कोणताही संपर्क राहू नये यासाठी त्यांना गुवाहटीला हलवण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण एकनाथ शिंदे अजूनही भाजपासोबत सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत.

आसाममध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा केला. “बाळासाहेबांचं हिंदुत्व आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यांच्या मार्गावरच आमची वाटचाल राहील. माझ्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत आणि आणखी १० आमदार सोबत येणार आहेत”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.