राज्यपालांना कुठेही पाठवा पण महाराष्ट्रात ठेवू नका…

WhatsApp Group

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली असून निदर्शनेही केली जात आहेत. दुसरीकडे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचा बचाव करताना दिसत आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे असं भाजपकडून म्हटलं जातं आहे. आतापर्यंत राज्यपालांबाबत एकनाथ शिंदे गटाकडून कोणतीही तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, आता एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना अन्य ठिकाणी पाठवण्याची मागणी केली आहे.

आमदार संजय गायकवाड म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसलेल्या व्यक्तीची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याने राज्याचे भले होणार नाही. तसेच महाराष्ट्रात मराठी माणसाला राज्यपाल करावे. भाजपचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांवर रोज काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, जे योग्य नाही. यामुळे एक दिवस दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम दोन्ही पक्षांना भोगावा लागणार आहे.

नेमकं प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंचावरून बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते की, जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा आम्हाला विचारण्यात आले होते की शाळेत आमचा आदर्श कोण आहे. त्यावेळी आम्ही विद्यार्थी आम्हाला जे आवडेल ते सांगायचो. म्हणजे कुणी सुभाषचंद्र, कुणी नेहरू, कुणी गांधीजी. तो ज्याला चांगलं मानत त्याचंच नाव घेत असे. आज आदर्श शोधायचा असेल तर बाहेर जाण्याची गरज नाही. तुमचा आदर्श तुम्हाला महाराष्ट्रातच सापडेल. जर कोणी तुम्हाला विचारले की तुमचे नायक कोण आहेत, तर मला वाटते ते तुम्ही सांगू शकता. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळचा आदर्श आहे. मी एका नव्या युगाबद्दल बोलत आहे. तुम्हाला इथे डॉ. आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरी सापडतील.

दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच पत्र लिहून माफी मागितली होती. त्रिवेदींच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. एका खासगी वाहिनीच्या डिबेट शोमध्ये झालेल्या संवादादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.