
मुंबई – मुंबईतील कुर्ला नेहरूनगर परिसरामध्ये एक इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून याबाबत आता एक मोठी अपडेट हाती आली आहे. इमारत दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना आता एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दुर्घटनेतील मृतांना 5 लाख तर जखमी झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 1 लाखांची मदत जाहीर केली आहे.
कुर्ला येथील नाईक नगरमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेकांना यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमध्ये काही जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर एकाचा यात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्याची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे.
दुःखद घटना
नाईक नगर, कुर्ला (पू) येथे चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. अग्निशामक , महानगरपालिका , पोलिस यंत्रणा बचाव कार्य सुरू आहे.
कुटुंबियांना 1 लाख व मृत व्यक्तींना 5 लाख मा मंत्री एकनाथ शिंदे , आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे करण्यात येईल @mieknathshinde pic.twitter.com/dqLciAzmIW— Mangesh Kudalkar – मंगेश कुडाळकर (@mlamangesh) June 28, 2022
दरम्यान, इमारत दुर्घटनेची माहिती समजताच, गुवाहाटी येथे थांबलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारत स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. इमारत दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची तर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.