

दीपक केसरकर म्हणाले, अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असूनही शिक्षण विभाग चांगले काम करीत आहे. हे काम अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी दिशादर्शिकेच्या माध्यमातून नियोजन करता येईल. त्याचप्रमाणे शिक्षणगाथा या त्रैमासिकाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील यशस्वी गाथा इतरांपर्यंत पोहोचून त्यांनाही प्रेरणा मिळेल. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या शैक्षणिक दिनदर्शिकेचे कौतुक करून याचा महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व यंत्रणांना नक्कीच फायदा होईल तसेच कामकाजात एकसूत्रता व गतिमानता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता असते, त्यादृष्टीने शाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी बोलताना दिले.
श्री.देओल यांनी ‘दिशादर्शिके’च्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये येणाऱ्या नवीन पिढीला विभागाची कार्यपद्धती समजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठका, विविध उपक्रम, कार्यक्रम यांचे नियोजन करणेदेखील यामुळे सोपे होणार असून ‘शिक्षणगाथा’ त्रैमासिकामुळे नवनवीन प्रयोग आणि चांगल्या कल्पना इतरांनाही समजतील, असे ते म्हणाले.
आयुक्त श्री.मांढरे यांनी दिशादर्शिकेमुळे अनावश्यक कामांमधला वेळ वाचून कामांची पूर्वतयारी करण्यासाठी ती उपयुक्त ठरेल असे सांगितले. विद्यार्थी आणि गुणवत्ता हा केंद्रबिंदू मानून काम करण्याच्या सूचना मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या होत्या, याचा उल्लेख करून त्या अनुषंगाने चांगली कामे ‘शिक्षणगाथा’ च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला.डॉ.पालकर यांनी प्रास्ताविकाद्वारे दिशादर्शिका आणि शिक्षणगाथा बाबत माहिती दिली. तर, विभागीय उपसंचालक संदीप संघवी यांनी आभार मानले.