देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना राष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनीही आज (मंगळवार) 29 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत जवळपास 26 टक्क्यांनी खाली आली आहे. असे असतानाही देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात महागाईची आग सतत धगधगत आहे. 22 मार्चपासून म्हणजे आता 8 दिवसांत 7 वेळा तेल कंपन्यांनी वाहन इंधन पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. तर खाद्यतेलामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय तेल कंपन्यांच्या ताज्या अपडेटनुसार, आज सकाळी 6 वाजल्यापासून दिल्लीत पेट्रोल 80 पैशांनी आणि डिझेल 70 पैशांनी महागले आहे. यासोबतच देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोल आता 100.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 91.47 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. इंडियन ऑइल कंपन्यांनी एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 30 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ केली होती. गेल्या आठ दिवसांत सातव्यांदा तेलाच्या दरात वाढ झाली आहे.