Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक, जमीन घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार

WhatsApp Group

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथक आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहे. संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते. 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्यात राऊत यांची चौकशी सुरू असून तपासात सहकार्य न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर रविवारी सकाळी मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे एक पथक मुंबईतील भांडुप येथील घरी पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तपासात असहकार्य केल्यामुळे हे पथक त्यांच्या घरी पोहोचले. ईडीचे पथक राऊत यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी करू शकते, असे मानले जात आहे. 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची आधीच चौकशी करत आहे. त्यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते. मात्र, ते अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाही. यानंतर आता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण 

मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे क्षेत्र आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.