संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स, खात्यात 1.08 कोटी आले कुठून?

WhatsApp Group

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ केल्यानंतर काही तासांतच हे समन्स जारी करण्यात आले. गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी केंद्रीय एजन्सीने संजय राऊत यांना रविवारी अटक केली. या प्रकरणात संजय राऊत यांच्याशिवाय त्याची पत्नी आणि काही कथित साथीदारांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

वर्षा राऊत यांच्या खात्यातील व्यवहार उघडकीस आल्यानंतर समन्स बजावण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, ईडीने सांगितले की वर्षा राऊत यांच्या खात्यात असंबंधित व्यक्तींकडून 1.08 कोटी रुपये मिळाले आहेत. यापूर्वी ईडीने एप्रिलमध्ये राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या दोन साथीदारांची 11.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

मुंबईतील विशेष न्यायालयाने गुरुवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. सक्तवसुली संचालनालयाने त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.