शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. महिला उत्कर्ष मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून त्यांना देण्यात आले आहेत.

भावना गवळी यांना याआधीही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. परंतु त्या वेगवेगळ्या कारणांमुळे चौकशीला येऊ शकत नाही, असे ईडीला कळवले होते. मात्र आता चौकशीसाठी हजर न राहिल्यास ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याचीही माहिती मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

गवळी यांच्याविरुद्ध हरीश सारडा यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. १९९२ मध्ये भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची स्थापना करून राज्य सरकारच्या हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून ४३ कोटीचे कर्ज मिळविले होते.

२००२मध्ये भावना गवळी यांनी या कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली होती. त्यातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.