नागपूर – नागपुरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरमधील घरी दाखल झाले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे वकील व राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ईडीने कोणत्या कारणावरुन छापा टाकला हे अद्याप समोर आलेलं नाही. भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचे सांगण्यात येतं आहे.
सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिकच चर्चेत आले होते. गेल्या काही वर्षांपासून उके यांनी भाजप नेत्यांविरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आहेत.
तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते भाजप नेत्यांवर आरोपही करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील, अशीही त्यांची ओळख आहे.