सरकारी अधिकाऱ्याकडून 20 लाखांची लाच घेत होता ईडीचा अधिकारी, रंगेहात अटक

पोलिसांनी ईडी अधिकाऱ्याच्या गाडीचा 8 किलोमीटर पाठलाग केला, 20 लाखांची लाच घेताना केली अटक

WhatsApp Group

तामिळनाडूमधील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्याला 20 लाख रुपयांची लाच घेताना दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेला ईडी अधिकारी सरकारी अधिकाऱ्याकडून लाच घेत होता. अंकित तिवारी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. अंकित तिवारी हे मदुराई येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात तैनात होते. यानंतर अंकित तिवारीशी संबंधित प्रकरणासंदर्भात मदुराईच्या ईडी कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. या काळात ईडी कार्यालयाजवळ सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.

या प्रकरणात ईडीच्या इतर अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा संशय आहे. त्याआधारे ईडीच्या कार्यालयातच छापा टाकण्यात आला. DVAC ने एका निवेदनात म्हटले आहे की, अंकित तिवारीला शुक्रवारी दिंडीगुल येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी अधिकाऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी अधिकाऱ्यांनी अंकित तिवारीची कसून चौकशी केली. डीव्हीएसीने सांगितले की, आमची टीम तपास करत आहे की आरोपी अधिकाऱ्याने याआधी इतर कोणाकडून ब्लॅकमेल करून किंवा धमकी देऊन लाच घेतली होती का.

DVAC ने दावा केला आहे की जेव्हा सरकारी कर्मचारी मदुराईला पोहोचला तेव्हा अंकित तिवारीने या प्रकरणात कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्याला 3 कोटी रुपये देण्यास सांगितले. यानंतर आपण आपल्या वरिष्ठांशी बोललो आहोत आणि त्यांच्या सूचनेनुसार त्याने 51 लाख रुपये घेण्याचे मान्य केले असल्याचे त्याला सांगण्यात आले. यानंतर 1 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्याने अंकितला 20 लाख रुपये दिले. त्यानंतर तिवारीने कर्मचार्‍याला व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून 51 लाखांची संपूर्ण रक्कम द्यावी, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली.

यानंतर सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्यावर संशय आला. सरकारी कर्मचाऱ्याने गुरुवारी ईडी अधिकाऱ्याविरुद्ध दिंडीगुल जिल्हा दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक युनिटकडे तक्रार दाखल केली. यानंतर शुक्रवारी DVAC अधिकाऱ्यांनी अंकित तिवारी याला तक्रारदाराकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. निवेदनात म्हटले आहे की, ईडी अधिकाऱ्याला सकाळी 10.30 वाजता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. तसेच या संदर्भातील अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.