महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांना ईडीने शुक्रवारी (12 मे) हजर राहण्यास सांगितले आहे. पाटील यांची IL&FS प्रकरणात चौकशी होणार आहे.
यापूर्वी, आयएल अँड एफएसशी संबंधित मनी लाँड्रिंग तपासात, कोहिनूर कन्स्ट्रक्शनला दिलेल्या कर्जासंदर्भात ईडीने राज ठाकरे यांचीही चौकशी केली होती.
नेमकं प्रकरण काय आहे?
अंमलबजावणी संचालनालय इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL&FS) शी संबंधित कथित अनियमिततेची चौकशी करत आहे. कोहिनूर सीटीएनएलमधील IL&FS समूहाच्या इक्विटी गुंतवणुकीशी संबंधित ही चौकशी आहे. कोहिनूर सीटीएनएल दादरमध्ये कोहिनूर स्क्वेअर टॉवर बांधत आहे.
या प्रकरणी ईडीला जयंत पाटील यांची चौकशी करायची आहे. जयंत पाटील हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. तपास यंत्रणेने त्यांना शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोलावले आहे.