जास्त चॉकलेट खाणे पडू शकते महागात, उद्भवू शकतात ‘या’ समस्या

WhatsApp Group

चॉकलेट आवडत नसेल अशी कदाचितच कोणी व्यक्ती असेल. जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना चॉकलेट खायला हे आवडंत. त्यामुळे देशात दिवसेंदिवस चॉकलेटची क्रेझ वाढताना दिसत आहे. पण आता चॉकलेट खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जास्त प्रमाणात चॉकलेट खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. ऐकून विचित्र वाटेल पण, एका अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘लिव स्ट्रांग’ च्या रिपोर्टनुसार, चॉकलेटचं जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे आपल्या शरीराचं मोठ्या प्रमाणात नुकसानं होऊ शकतं. चॉकलेटचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. 2017 च्या ‘जर्नल ऑफ फूड प्रोटेक्शन रिपोर्ट’मध्ये चॉकलेटमुळे होणाऱ्या ऍलर्जीबद्दल तपशीलवार माहिती शेअर करण्यात आली होती.

ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे, त्यांनी चॉकलेट कमी प्रमाणात खावे. चॉकलेटमध्ये विषारी घटक देखील असू शकतात. त्यामध्ये असलेले कॅडमियम आणि निकेलचे अतिरिक्त प्रमाण तुमच्या शरीरात जमा होते, ज्यामुळे खूप नुकसान होण्याची शक्यता असते.

फूड कंट्रोल जर्नलमध्ये 2015 च्या लेखात प्रकाशित केलेल्या अभ्यासादरम्यान चाचणी केलेल्या 25% चॉकलेट नमुन्यांमध्ये दूषित जीवाणू आढळले. हे जीवाणू आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. चॉकलेटमुळे छातीत जळजळ देखील होऊ शकते. अमेरिकन सोसायटी फॉर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीच्या मते, चॉकलेट अन्ननलिका स्फिंक्टरचा दाब कमी करते, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.

ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, अशा लोकांनी चॉकलेटपासून दूर राहावे. मार्च 2015 मध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये चॉकलेट खाणे आणि वजन वाढणे यांच्यातील संबंध उघड झाला. संशोधकांनी तीन वर्षांच्या कालावधीत पोस्टमेनोपॉझल महिलांचे सर्वेक्षण केले. परिणामांमध्ये असे दिसून आले की ज्या महिला अधिक चॉकलेटचे सेवन करतात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते.