तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता ऑस्ट्रेलिया खंडाच्या दक्षिणेला असलेला न्यूझीलंड हा देशही भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. बुधवारी (15 फेब्रुवारी) दुपारी न्यूझीलंडमध्ये 6’1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
न्यूझीलंडच्या सिव्हिल डिफेन्स एजन्सीने सांगितले की, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच सरकारने याबाबत सुनामीचा इशाराही दिलेला नाही. मात्र, भूकंपामुळे सुमारे 10-20 सेकंद पृथ्वी हादरली, असे येथे राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.
15 मिनिटांत, 31000 हून अधिक लोकांनी जिओनेटवर भूकंप जाणवल्याचे कळवले. न्यूझीलंडच्या सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने सांगितले की, “तेथे मोठा धक्का बसला आहे! परापरामुच्या उत्तर-पश्चिमेस 50 किमी अंतरावर 57 किमी खोलीवर 6.0 तीव्रतेचा भूकंप जाणवला.”
विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये ‘गॅब्रिएल’ चक्रीवादळाचा धोका आठवडाभरापासून कायम होता. त्यामुळे येथील अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूर आला होता. गंभीर परिस्थितीनंतर सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. येथे 6 भागात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.