Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये भूकंपाचा कहर; 162 जणांचा मृत्यू, पाहा भयानक PHOTOS

WhatsApp Group

सोमवारी इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपामुळे 162 जणांचा मृत्यू झाला असून 700हून अधिक जण जखमी झाले आहेत. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. भूकंपानंतर झालेल्या विध्वंसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी होती. भूकंपामुळे शेकडो इमारतींचे नुकसान झाले असून लोकांना जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपामुळे डॉक्टरांनी घाईघाईत रूग्णांना रूग्णालयातून बाहेर काढले. रूग्णांना रूग्णालयातून सुखरूप बाहेर काढल्याने डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, गंभीर रुग्णांचे उपचार ठप्प झाले होते.

भूकंपामुळे काही तास वीजपुरवठा खंडित होता. विजेअभावी वृत्तवाहिन्यांचे अपडेट्स मिळत नसल्याने घाबरलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, अजूनही 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, बचावकार्य रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. एजन्सीने सांगितले की मृतांची संख्या 162 वर पोहोचली आहे. 2000 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच, 5,000 हून अधिक लोकांना सुरक्षित केंद्रात नेण्यात आले आहे. मीडियाशी बोलताना पश्चिम जावाचे गव्हर्नर रिदवान कामिल यांनी सांगितले की, लोक घाबरले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागेल. भूस्खलनामुळे अनेक रस्ते गाडले गेले आहेत, ते बुलडोझरच्या साहाय्याने पुन्हा खुले करण्यात येत आहेत. हे शहर डोंगराळ भाग असल्यामुळे बचावकार्यात अडचण येत आहे.

परिस्थिती अशी होती की लोक रडत होते आणि आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत होते. रस्त्यावर मृतदेह पडलेले होते. लोक त्यात आपल्या ओळखीचे लोक शोधत होते. कामिल यांनी सांगितले की, अजूनही अनेक लोक घटनास्थळी अडकले आहेत, जखमी आणि मृतांची संख्या वाढेल.

सियांजूरच्या स्थानिक प्रशासनाच्या प्रमुखांनी सांगितले की बहुतेक मृत्यू रूग्णांना दाखल करण्यात आलेल्या रूग्णालयात झाले आहेत आणि ते रूग्णालय अवशेष बनले आहे. त्यांनी इंडोनेशियन मीडियाला सांगितले की, भूकंपानंतर शहरातील सायंग रुग्णालयात वीज नव्हती, त्यामुळे डॉक्टरांना पीडितांवर त्वरित उपचार करता आले नाहीत. ज्यामध्ये काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ते म्हणाले की रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची तातडीची गरज होती परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आहे.