
सिंधुदुर्ग – कोकणातील सर्वात मोठी जांभूळ निर्यात करणारी बाजारपेठ जांभळाविना सुनीसुनी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील आकेरी गावामध्ये जांभळाची कोकणातील सर्वात मोठी बाजारपेठ आहेत. यावर्षी जांभूळ पीक अत्यल्प आल्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी जांभूळवर प्रक्रिया करणारे उद्योग सर्वांना मोठा फटका बसला आहे. जांभूळ प्रक्रिया उद्योग बंद पडले तर शेतकरी आणि व्यापारी जांभूळ पीक न आल्यामुळे हताश झाले आहेत. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे कोकणामध्ये 10 ते 12 टक्के जांभूळ पीक आलं मात्र तेही पावसामुळे गेल्यामुळे कोकणातील जांभूळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सिंधुदुर्गात 200 ते 250 शेतकरी जाभूळाचे उत्पादक घेणारे शेतकरी आहेत. कुडाळ तालुक्याच्या पूर्वेस अगदी हद्दीवर आणि सावंतवाडी तालुक्याच्या प्रारंभाला हे गाव आहे. जांभूळ पिकाच्या उत्पादनाबरोबरच जांभळाच्या निर्यातीसाठी आकेरी गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. कोकणातील आकेरी गावातील या बाजारपेठेतून मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव या मोठ्या बाजारपेठेमध्ये जांभूळ निर्यात केली जायची. मात्र यावर्षी जांभूळ पीक न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा, काजू उत्पादनाबरोबरच जांभळातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. सिंधुदुर्गात कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये जांभूळाचं उत्पादन घेतले जाते. परंतु या पिकावर आता निसर्गानेही आपली वक्रदृष्टी वळवली आहे. यंदा जांभळाचे उत्पादन अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून होणारी जांभळाची निर्यात मंदावली आहे.