सावंतवाडी – संकेश्वर बांदा महामार्गाचा आराखडा तयार झाला असून हा महामार्ग आंबोली घाटातूनच(Amboli Ghat) जाणार आहे. त्यासाठी वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच बांधकाम विभागानेही घाटमार्ग अद्याप रस्ते महामार्ग विभागाकडे वर्ग केला नाही. तरीही रस्ते महामार्ग विभागाने गेल्या चार दिवसांपासून घाटात आपले काम सुरू केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ऐन पावसाच्या तोंडावरच घाटातील दरडींवर ड्रिल करण्यात येत असून घाटमार्गाला पावसाळ्यात धोका उद्भवू शकतो. त्यामुळे कामाची परवानगी कोणी दिली यावर आता सवाल उपस्थित होत आहे.
संकेश्वर बांदा महामार्गाचा आराखडा राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडून तयार करण्यात आला आहे. संकेश्वर पासून आजरा फाट्या पर्यंतच्या कामाची निविदा काढण्यास केंद्राकडून मंजूरी ही देण्यात आली आहे. असं असलं तरी आंबोली पासून पुढे माडखोल पर्यतच्या रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. तर हा महामार्ग आंबोली घाटातून जाणार हे निश्चित असले तरी आंबोली घाट रस्ता हा वनविभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे वनविभागाकडून परवानगी घेणे महामार्ग विभागाला बंधनकारक असणार आहे.
आंबोली घाट हा पावसाळ्यात धोकादायक असतो. या घाटातून अवजड वाहने ही सोडली जात नाहीत. असं असतानाच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सर्व नियम धाब्यावर बसवत घाटातील दरडीना ड्रिल मारण्यात येत आहे.त्यामुळे घाट मार्गाला हादरा बसून ऐन पावसाळ्यामध्ये हा घाटमार्ग धोकादायक बनल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे वनविभागाकडून ही याला कोणतीही हरकत घेण्यात आली नाही. त्यामुळे आंबोली घाट मार्गाचे सोयरसुतक कोणाला नसल्याचे यातून दिसून येते.