द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती, CJI एन.व्ही. रमण्णा यांनी दिली शपथ

WhatsApp Group

आज (सोमवारी 25 जुलै) रोजी द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पदाची शपथ दिली. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद धारण करणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, भारतातील सर्व नागरिकांच्या आशा-आकांक्षा आणि हक्कांचे प्रतीक असलेल्या या पवित्र संसदेकडून मी सर्व देशवासियांना विनम्र अभिवादन करते. तुमची आत्मीयता, विश्वास आणि तुमचा पाठिंबा हीच माझ्यावरील ही नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी माझी सर्वात मोठी ताकद असेल.

देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, भीमराव आंबेडकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि महात्मा गांधी यांचाही उल्लेख केला. एवढेच नाही तर त्यांनी राणी लक्ष्मीबाईसह अनेक महिला राज्यकर्त्यांचा उल्लेख केला. आदिवासींच्या वारशाची आठवण करून देताना त्या म्हणाल्या, कोल क्रांती, भिल क्रांती यासह अनेक चळवळी आदिवासींच्या नेतृत्वाखाली झाल्या आणि त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. संसदीय लोकशाही म्हणून भारताने खूप प्रगती केली आहे.