बलगवडे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय ग्रामीण भागाला संजीवनी ठरेल – सहसचिव प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के

बलगवडे : तासगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय ग्रामीण भागाला संजीवनी ठरेल असे मत पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबईचे सहसचिव प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के यांनी व्यक्त केले, ते तासगाव तालुक्यातील बलगवडे या गावात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या नियोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज च्या नामफलक अनावरण समारंभात बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्यकारी समिती संचालक चंद्रशेखर कांबळे, स्थानिक कार्यकारी समिती संचालक संदेश भंडारे, बलगवडे गावचे सुपुत्र मुंबई मंत्रालयातील पत्रकार राजा आदाटे, सरपंच जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल थोरात, शिक्षणतज्ञ जयवंत माळी, गावचे नेते अनिल पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
याप्रसंगी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के यांच्या हस्ते विधी महाविद्यालयाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गावच्या सरपंच जयश्री पाटील यांनी ग्राम पंचायतीच्या वतीने कॉलेज साठी लागणारा ग्रामसभेचा ठराव आणि जागेची कागदपत्रे संस्थेचे सहसचिव प्राचार्य म्हस्के यांचेकडे सुपूर्त केली.
यानंतर प्राचार्य डॉ. मस्के पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री तथा पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ना. रामदासजी आठवले यांचे जन्मभूमी सांगली जिल्ह्यात एक सुसज्ज महाविद्यालय सुरु करायचे स्वप्न आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांनी या महाविद्यालयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या कॉलेज साठी, जागेसाठी लागणार्या सर्व प्रशासकीय परवानग्या लवकरात लवकर मिळवून पुढील वर्षभरात महाविद्यालय सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. लवकरच याठिकाणी सर्वसोईनियुक्त अद्यावत विधी महाविद्यालय त्याचबरोबर मुंबई दिल्लीच्या धर्तीवर एम. पी. एस. सी. , यू. पी. एस. सी. ट्रेनिंग सेंटर, मुला मुलींचे वसतिगृह अशा सुविधा उपलब्ध होतील.
प्राचार्य म्हस्के पुढे म्हणाले की, ना. रामदास आठवले यांचे आपल्या भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वकील बनवण्याचे, त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना समृद्ध करणाऱ्याचे स्वप्न साकार होत असून तासगाव तालुक्यातील बलगवडेकरांनी दिलेलं योगदान गावाला जगाच्या नकाशावर नेईल.
संस्थेचे संचालक चंद्रशेखर कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा तळागाळात रुजवण्यासाठी संस्था कार्यरत आहे. या जिल्ह्याचे सुपुत्र ना. आठवले हे केंद्रात मंत्री असून त्यांच्या माध्यमातून विकासाची गंगोत्री तासगावच्या ग्रामीण भागात यावी हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
बलगवडे गावचे नेते अनिल पाटील म्हणाले की, आमच्या गावाने डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेला विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी १० एकर गायरान जागा उपलब्ध करून दिली आहे. डॉ.आंबेडकरांच्या शिक्षण संस्थेचे विधी महाविद्यालय आमच्या गावात सुरू होणार आहे ही गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या कॉलेज साठी लागणारे सर्व सहकार्य करायला संपूर्ण ग्रामस्थ तयार आहेत. या कॉलेज मुळे गावातील उद्योगधंदे, रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.
यावेळी आर. पी. आय. चे युवा नेते संदेश भंडारे, विलासराव पाटील, आर. पी. खराडे, धनाजी शिंदे, शुभम पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले, तर प्रास्ताविक राजा आदाटे, आभार अनिल पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमास पोलीस पाटील रघुनाथ पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष निवास पाटील, उपसरपंच श्रीकांत मोहिते, ग्रामसेवक विजय पाटील, उध्दव शिंदे, कॅप्टन बजरंग पाटील, सतीश पाटील, धनाजी शिंदे, सुनील माळी, मधुकर शिंदे, सरदार मुलाणी, सुर्यकांत थोरात, दिलीप थोरात, संजय रास्ते, शहाजी पाटील, सचिन पाटील, प्रशांत पाटील, बंडू पाटील उपस्थित होते.