अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शेवटचा इशारा देत म्हटले आहे की, जर इराणने प्रस्तावित शांतता करार मान्य केला नाही, तर अमेरिका इराणमधील प्रत्येक पॉवर प्लांट आणि पूल जमीनदोस्त करेल. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवरून ही आक्रमक भूमिका मांडल्याने मध्य-पूर्वेसह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
सीजफायर उल्लंघनाचे गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संघर्षविराम (Ceasefire) कराराचा भंग केल्याचा मोठा आरोप केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये गोळीबार करून आंतरराष्ट्रीय जहाजांना लक्ष्य केले आहे. यामध्ये फ्रान्स आणि ब्रिटनच्या जहाजांचाही समावेश आहे. “इराण स्वतःला ‘टफ गाय’ दाखवण्याच्या प्रयत्नात आपलेच नुकसान करून घेत आहे,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी तंज कसला. या रास्त्यावरील तणावामुळे इराणला दररोज ५० कोटी डॉलर्सचा फटका बसत असून अमेरिकेची आर्थिक स्थिती मात्र अधिक मजबूत होत असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.
आर्थिक नाकेबंदी आणि अमेरिकेचा फायदा
इराणच्या आक्रमक पवित्राचा अमेरिकेला कसा फायदा होत आहे, याचे विश्लेषणही ट्रम्प यांनी केले. त्यांनी सांगितले की, इराणच्या या कृत्यांमुळे जगाचा विश्वास अमेरिकन ऊर्जेवर वाढला असून अनेक तेलवाहू जहाजे आता इराणऐवजी अमेरिकेतील टेक्सास, लुइसियाना आणि अलास्का येथील बंदरांकडे वळत आहेत. इराण नकळतपणे अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीला मदतच करत असल्याचे ट्रम्प यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.
इस्लामाबादमध्ये शांततेची शेवटची संधी
एककीकडे युद्धाची धमकी दिली जात असताना, दुसरीकडे मुत्सद्देगिरीचा मार्गही अवलंबला जात आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जारेड कुशनर दाखल झाले आहेत. अमेरिका हा करार पूर्ण करण्यासाठी गंभीर असून लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. मात्र, या चर्चेतून तोडगा न निघाल्यास मध्य-पूर्वेमध्ये एका भीषण युद्धाची ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे.
