
मुंबई – पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. संजय राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात कैदेत आहेत. त्यामुळे अटकेपूर्वी दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त असणारे संजय राऊत यांचा आर्थर रोड तुरुंगातील दिनक्रम आता समोर आला आहे.
संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील कैदी नंबर 8959 आहे. संजय राऊत यांना सुरक्षितेच्या कारणास्तव इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले आहे. आर्थर रोड तुरुंगामध्ये संजय राऊत ग्रंथालयातील वर्तमानपत्र, पुस्तके वाचतात. याशिवाय टीव्हीवर बहुतांश वेळ तेटीव्हीवरील बातम्या पाहून ते घडामोडींवर लक्ष ठेवतात. पत्रकार म्हणून लिहिण्याचा छंद असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार त्यांना वही आणि पेनही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संजय राऊत हे दिवसभरातील बराच वेळ लिखाणात व्यस्त असतात. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इतर सामान्य कैद्यांपासून दूर ठेवण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी जेल अधिकारी घेत आहेत.
संजय राऊत यांना न्यायलयाच्या आदेशानुसार घरचे जेवण दिले जात आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषध पुरवली जात आहेत. संजय राऊत यांचे भाऊ शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली होती. बुधवारी सुनिल राऊत यांनी संजय राऊत यांची तुरुंग अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये भेटण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना तशी परवानगी नाकारण्यात आली.
काय आहे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण पत्रा चाळ जमीन खरेदीशी संबंधित आहे. 1,039 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी ईडीने पीएमएलए अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या पत्नी आणि जवळच्या नातेवाईकांची 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.