धुळे संघाने मोठ्या फरकाने जालना संघावर मात करत विजयी सलामी दिली

WhatsApp Group

पुणे: के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये धुळे जिल्हा विरुद्ध जालना जिल्हा या दोन संघाच्या मध्ये पहिल्या दिवसाचा तिसरा सामना झाला. अक्षय पाटीलच्या चतुरस्त्र चढायांनी धुळे संघाने चांगली सुरुवात केली होती. 3-0 अश्या सुरुवाती नंतर धुळे संघ 3-5 असा पिछाडीवर आल्याने सामन्यात चुरस वाढली. त्यानंतर धुळेच्या अक्षय पाटील ने चढाईत तर राज कुंवर ने पकडीत गुण मिळवत मध्यंतराला 13-11 अशी आघाडी मिळवून दिली.

मध्यंतरा पर्यत जालना संघाकडून सांघिक खेळ बघायला मिळाला. चढाईत अजय राठोड तर पकडीत सुनिल राठोड यांनी गुण मिळवत सामन्यात चुरस आणली. मध्यंतरा नंतर धुळे संघाने जालना संघाला ऑल आऊट करत 19-12 अशी आघाडी मिळवली. अक्षय पाटील ने सुपर टेन तर राज कुंवर ने हाय फाय पूर्ण करत संघाचा विजय निश्चित केला. उत्तरार्धात आणखी एकदा जालना संघाला ऑल आऊट करत धुळे संघाने 37-19 अश्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

धुळे संघाने चढाईत 18 तर पकडीत 15 गुण मिळवत अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. धुळे कडून अक्षय पाटील ने चढाईत 14 गुण मिळवले. तर बचवाफळीत राज कुंवर ने 5 गुण, रोहित पाटील व सोयाब तांबोळी ने प्रत्येकी 4 पकडीत गुण मिळवले. जालना संघाकडून सुनिल राठोड ने हाय फाय पूर्ण केला तर चढाईत 2 गुण मिळवत धुळे संघाला एकाकी झुंज दिली.

  • बेस्ट रेडर- अक्षय पाटील, धुळे
  • बेस्ट डिफेंडर- राज कुंवर, धुळे
  • कबड्डी का कमाल- सुनिल राठोड, जालना