धोनीचा माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकरला अटक, 15 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

WhatsApp Group

MS Dhoni’s Ex Business Partner Arrested: महान फलंदाज-विकेटकीपर आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा माजी व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर याला अटक करण्यात आली आहे. धोनीने दिवाकर विरोधात 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मिहिर दिवाकरने क्रिकेट अकादमी सुरू केली होती आणि त्यासाठी धोनीच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

धोनीने अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध रांची जिल्हा न्यायालयात ही तक्रार केली होती. मिहिर दिवाकर आणि सौम्या दास हे या कंपनीचे संचालक आहेत. जयपूरमध्ये क्रिकेट अकादमी उघडण्यासाठी धोनीच्या नावाचा गैरवापर केल्याप्रकरणी जयपूर पोलिसांनी दिवाकरला ताब्यात घेतले आहे. एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2021 रोजी अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीसोबतचे नाते संपवले होते.

त्यानंतरही दिवाकरने भारतात आणि परदेशात क्रिकेट अकादमी चालवत धोनीच्या नावाचा वापर सुरू ठेवल्याचा आरोप आहे. त्याने एमएस धोनी क्रिकेट अकादमी आणि एमएस धोनी स्पोर्ट्स अकादमी यांसारख्या अकादमींसाठी फ्रँचायझी फी घेतल्याचा आरोप आहे. एकूण 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. दिवाकरला नोएडा येथून अटक करण्यात आली, तेथून त्याला जयपूरला पाठवण्यात आले.