मुंबई : धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मुंबई मिरा रोड येथे १८ व १९ मार्च रोजी झालेल्या दिव्य दर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (महा. अनिस) विरोध केला होता. त्यासंबंधीपोलिसांना निवेदन दिले होते. धिरेंद्र शास्त्री Dhirendra Krishna Shastri हे अंधश्रद्धा पसरवतात, चमत्काराचा दावा करतात आणि संत समाजसुधारकांचा अवमान करणारे भाष्य करतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी तसेच कार्यक्रम रद्द करावा.
महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायदयानुसार त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महा. अंनिसने केली होती. मात्र मीरा रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी धिरेंद्र शास्त्रीवर कारवाई करण्याऐवजी महाराष्ट्र अंनिसने कार्यक्रमात धरणे, निदर्शने, आंदोलन करू नये म्हणून कलम 149 अंतर्गत महा. अंनिसचे राज्य प्रधानसचिव नंदकिशोर तळाशीलकर आणि अन्य कार्यकर्त्यांना नोटीस दिली होती.
महा. अंनिसने पोलिसांना दिलेल्या निवेदनात कुठेही धरणे आंदोलन करणार असे लिहिलेले नव्हते. तरीही पोलिसांनी कार्यकर्त्यांना चुकीची नोटीस दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून कायदे विभागाच्या सहकार्यवाह ऍड. तृप्ती पाटील, वरिष्ठ वकील निलेश पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर पाठपुरावा सुरू होतो. कार्यकर्त्याना दिलेली नोटीस मागे घ्या. ती नोटीस देणे चुकीची आहे, असे महा. अंनिसने पोलीस आयुक्तालयांना कळवले होते. त्यानंतर पोलीस उपयुक्तांमार्फत चौकशी होऊन ती नोटीस मागे घेतली आहे. नंदकिशोर तळाशीलकर, एडवोकेट तृप्ती पाटील, निलेश पावसकर, महाराष्ट्र अंनिस दहिसर शाखा, ठाणे शाखा यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळालेले आहे. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन !