विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यावर बंदी; DGCA ने सुरक्षेसाठी उचलले कठोर पाऊल
नवी दिल्ली: तुम्ही वारंवार विमानाने प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्याबाबत नवीन आणि कडक नियमावली लागू केली आहे. आता विमानाने प्रवास करताना प्रवाशांना त्यांचे फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वापरता येणार नाही. प्रवाशांच्या आणि विमानांच्या सुरक्षेसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आगीच्या वाढत्या घटनांमुळे निर्णय
जगभरात विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकमुळे आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पॉवर बँक आणि स्पेयर बॅटरीमध्ये लिथियमचा वापर केला जातो, ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. तांत्रिक बिघाड किंवा बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे (Overheating) या उपकरणांना अचानक आग लागण्याचा धोका असतो. विमानाच्या बंद केबिनमध्ये अशा प्रकारची छोटीशी आगही अत्यंत वेगाने पसरू शकते आणि संपूर्ण विमानासाठी तसेच प्रवाशांच्या जिवासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळेच डीजीसीएने प्रवासादरम्यान पॉवर बँकच्या वापराला पूर्णपणे मज्जाव केला आहे.
पॉवर बँक कुठे ठेवावी? जाणून घ्या नियम
डीजीसीएने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केले आहे की, प्रवाशांना पॉवर बँक त्यांच्या सोबत ‘केबिन बॅगेज’मध्ये (हँड लगेज) ठेवता येईल, मात्र ती ‘चेक-इन लगेज’मध्ये ठेवण्यास सक्त मनाई आहे. याशिवाय, विमानातील डोक्यावर असलेल्या स्टोरेज कंपार्टमेंटमध्ये (Overhead Bin) पॉवर बँक ठेवणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण जर अशा बॅटरीला आग लागली, तर बंद असलेल्या कंपार्टमेंटमध्ये धूर किंवा आगीचा लवकर पत्ता लागत नाही, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
एअरलाईन्सकडून सूचना आणि खबरदारी
नवीन नियमांनुसार, आता विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान एअरलाईन्सकडून विशेष घोषणा (Announcements) केल्या जात आहेत. प्रवाशांनी आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी विमानातील इन-बिल्ट चार्जिंग पोर्टचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. जर एखाद्या प्रवाशाने प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते. विमान कंपन्यांनी प्रवाशांना बोर्डिंग पास मिळवण्यापासून ते विमानातील ब्रीफिंगपर्यंत या नवीन नियमांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे.
