गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळणार आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. महायुतीला राज्यात 237 इतक्या जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 132 जागा जिंकल्या. भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता. आज भाजपकडून आज विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, त्याला पक्षातील नेत्यांनी एकमताने अनुमोदन दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.