
मुंबई – बीकेसी मैदानामध्ये शिवसेनेनं शिवसंपर्क अभियानाची सभा बीकेसी मैदानात घेतली. विरोधकांनी केलेल्या आरोपांना ठाकरी भाषेत उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या या विराट सभेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करुन विरोधकांचा समाचार घेतला.
ठाकरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), किरिट सोमय्या यांच्यावर तोफ डागली. याच पार्श्वभूमीवर आता गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तरसभा घेतली आहे. याच सभेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत कडाडून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा वाघ आहेत. असं वक्तव्य करत देवेंद्र फडवीसांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले, मुंबईमध्ये कोविडचा भ्रष्टाचार झाला. मुंबईत कोविडमध्ये हत्या झाली की नाही ? मनसुख हिरेनची हत्या झाली की नाही ? गृहमंत्री जेलमध्ये गेलेत की नाही ? या सर्व गोष्टी होऊन मुख्यमंत्री यावर काहीच बोलले नाही. अडीच वर्षात यांनी एक देखील भाषण राज्याच्या विकासावर आणि लोकांच्या हितासाठी केले नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी असा विचार तरी केला होता की, त्यांच्या मुलाच्या राज्यामध्ये हनुमान चालीसा म्हणणे देशद्रोह होईल आणि औरंगजेबासाठी राज शिष्टाचार होतो. 24 महिन्यात 53 प्रॉपर्टी झाली आणि यशवंत जाधवने त्यांच्या मातोश्रीला 50 लाखाचे घड्याळ दिले.