इराणी सैन्याच्या गोळीबारातून ‘देश गरिमा’ची सुरक्षित सुटका! 31 भारतीय खलाशी सुखरूप; 22 एप्रिलला मुंबईत दाखल होणार
नवी दिल्ली/मुंबई: खाडी देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रातून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणच्या सैन्याने होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये दोन जहाजांवर गोळीबार करून दहशत निर्माण केली असतानाच, भारताचे कच्चे तेल वाहून नेणारे ‘देश गरिमा’ हे जहाज सुरक्षितपणे या धोक्याच्या पट्ट्यातून बाहेर पडले आहे. या जहाजावर ३१ भारतीय खलाशी असून ते सर्व सुखरूप असल्याची अधिकृत माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे.
युद्धाच्या छायेतून ‘देश गरिमा’चा प्रवास
१८ एप्रिल रोजी जेव्हा इराणी सैन्याने होर्मुज जलडमरूमध्य भागात नाकाबंदी केली होती, त्याच वेळी ‘देश गरिमा’ या मार्गावरून प्रवास करत होते. या भागात तणाव शिगेला पोहोचलेला असताना आणि गोळीबाराचे सत्र सुरू असतानाही, भारतीय जहाजाच्या कॅप्टनने आणि क्रू मेंबर्सनी अत्यंत सतर्कतेने हे जहाज सुरक्षित बाहेर काढले. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाला कोणतीही हानी पोहोचलेली नाही आणि नियोजित वेळापत्रकानुसार हे जहाज २२ एप्रिल रोजी मुंबई बंदरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
इतर दोन भारतीय जहाजांवर गोळीबार
‘देश गरिमा’ सुखरूप बाहेर पडले असले तरी, त्याच दिवशी इतर दोन भारतीय जहाजांना मात्र इराणच्या आक्रमकतेचा सामना करावा लागला. ‘VLCC समनार हेराद’ आणि ‘जग अर्णव’ या दोन जहाजांवर इराणी सैन्याने गोळीबार केला. या हल्ल्यानंतर दोन्ही जहाजांना आपला मार्ग बदलावा लागला आणि ती पुन्हा पर्शियन खाडीच्या दिशेने मागे वळाली. सुदैवाने, या हल्ल्यात कोणत्याही भारतीय खलाशाला दुखापत झालेली नाही.
भारत सरकार आणि नौदल हाय अलर्टवर
खाडीतील अस्थिर परिस्थिती पाहता भारत सरकार आणि सागरी सुरक्षा अधिकारी हाय अलर्टवर आहेत. भारतीय नाविक आणि जहाजांच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधला जात आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारतीय व्यापारी हितसंबंध आणि नागरिकांचे संरक्षण हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य मार्ग असल्याने, तिथल्या प्रत्येक घडामोडीवर भारतीय नौदल बारीक लक्ष ठेवून आहे.
